विनायक शिंपुकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील नागरिकांना वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे आजारांनी ग्रासले आहे. ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, न्यूमोनियासारख्या आजारांचे घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. नेहमीच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांसोबतच मोठ्यांचीही दवाखान्यांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनापाठोपाठ इतर आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने इचलकरंजीकर हैराण झाले आहेत.
शहरात सकाळी हवेतील गारवा, दुपारी कडक ऊन, तर सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण व अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी यांमुळे वातावरणात बदल झाल्याचे जाणवते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या काही दिवसांत सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. त्यात आजारी पडत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर विविध प्रकारच्या तपासण्या करण्यास सांगितले जात आहे. यात रक्त, लघवी, कोरोनासह इतर चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोना संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येत असल्याने प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता दिली. त्यामुळे नागरिकांची शहरातील वर्दळ व बाहेरगावचा प्रवास वाढल्याने आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाबरोबर इतर आजारांकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
चौकट
कोरोनामुळे भीतीचे वातावरण वातावरणातील बदलांमुळे इचलकरंजीत आजारांचे प्रमाण वाढले आहे. नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यात कोरोना आणि व्हायरल फिव्हरची लक्षणे सारखीच असल्याने नागरिक आणि लहान मुलांचे पालक घाबरून जात आहेत. रुग्णांचा ताप जात नसल्याने कोरोना आणि इतर काही लक्षणे दिसतात का, यांच्या चाचण्या आणि तपासण्यांमध्ये वाढ झाली आहे.