कोल्हापूर : कोल्हापुरातील स्थानिक समस्या या देशभरातील स्टार्टअप्सच्या अत्याधुनिक व कल्पक संकल्पनेतून सोडविण्यासाठी ‘कोल्हापूर स्टार्ट-अप मिशन’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर आणि आयआयटी, कानपूर यांच्यातर्फे होणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन आज (शुक्रवारी) संध्याकाळी ६.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने होईल. हा कार्यक्रम http://www.kolhapurstartupmission.com या संकेतस्थळावर लाईव्ह पाहता येईल.
या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयआयटी, कानपूरचे प्रोफेसर अमिताभ बंडोपाध्याय हे करणार आहेत.
स्टार्ट-अप इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर, आयआयटी कानपूर या जगभरातील अग्रगण्य संस्थेचा अनुभव आणि कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर आणि डी. वाय. पाटील ग्रुपचा स्थानिक पातळीवरील अनुभव व सहकार्यातून कोल्हापूर स्टार्ट-अप मिशन हे तंत्रज्ञानविषयक स्टार्ट-अप, तरुण संशोधक आणि स्थानिक प्रशासन यांना एकत्र आणून कोल्हापुरातील काही नाविन्यपूर्ण उपाय शोधणार आहे. कोल्हापूर शहरातील स्थानिक प्रश्न सोडविताना कोल्हापुरातील युवकांमध्ये संशोधन आणि उद्यमशीलता वाढविण्यासाठी स्टार्ट-अप आणि संशोधक यांना आवाहन करणे हा या मिशनचा उद्देश आहे.
वाहतूक, कचरा व्यवस्थापन
या उपक्रमासाठी कोल्हापूर शहरातील विविध नागरी समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अंतर्गत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वायू गुणवत्ता व्यवस्थापन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, ई-गव्हर्नन्स, कृषी, वाहतूक हे विषय असतील.
फोटो : १४०१२०२१-कोल-स्टार्ट अप मिशन