आजरा-आंबोली मार्गावरील मसोली फाटा ते मसोली गावापर्यंतचे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. ८० लाखांच्या निकृष्ट पद्धतीने केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मसोलीच्या सरपंच माधुरी तेजम, माजी सरपंच सुरेश होडगे व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मसोली गावापर्यंतच्या या रस्त्यावर सात मोऱ्या असून लांबी १.२०० किलोमीटर इतकी आहे. या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. सदरच्या रस्त्याचे काम ठेकेदाराने टेंडरप्रमाणे न करता मनमानी पद्धतीने केले आहे. याबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून सदरच्या कामाची तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, अन्यथा मसोली गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनातून सरपंच माधुरी तेजम, माजी सरपंच सुरेश होडगे व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
-----------------------
फोटो ओळी : पहिल्याच पावसाने मसोली (ता. आजरा) येथील निकृष्ट पद्धतीने केलेल्या रस्त्यावर पडलेल्या भेगा.
क्रमांक : १९०५२०२१-गड-०२