जयसिंगपूर : राज्याच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील सहकारी सूत गिरण्यांसाठी सुतगिरण्यांच्या प्रकल्प किमतीमध्ये सुधारणा केली असून यापूर्वी ६१ कोटी ७४ लाख निश्चित केलेल्या प्रकल्प किमतीमध्ये शासनाने सुधारणा करताना ती ८० कोटी ९० लाख इतकी निश्चित केली आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
राज्यातील सहकारी सुतगिरण्यांची प्रकल्प किंमत सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती हा निर्णय त्याचाच भाग असल्याचे राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी हा मोठा दिलासादायक निर्णय घेतला असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.
सन नोव्हेंबर २०१० मधील शासन निर्णयान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार जून २०११ मध्ये आदर्श प्रकल्प किंमत ६१ कोटी ७४ लाख इतकी निश्चित करण्यात आली होती. जुलै २०१४ मध्ये झालेल्या शासन निर्णयान्वये पुन्हा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. जमिनींच्या वाढलेल्या किमती, यंत्रसामग्री किमतींमध्ये झालेली मोठी वाढ तसेच बांधकाम खर्चामध्ये झालेली वाढ यामुळे राज्यातील सहकारी सुतगिरण्यांकडून प्रकल्प किमतीत वाढ व्हावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगाने सहकारी सुतगिरणींची प्रकल्प किमत सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव समितीच्या मार्च २०२१ मध्ये झालेल्या बैठकीसमोर ठेवण्यात आला होता. यावेळी दिलेल्या अहवालानुसार शासनाने सन २०१७-१८ च्या डीएसआरप्रमाणे सुधारित प्रकल्प खर्चाची किंमत निश्चित करताना त्यामध्ये जवळपास १९ कोटींची वाढ निश्चित करत ती ८० कोटी ९० लाख इतकी केली असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील महाराष्ट्रातील सहकारी सुतगिरण्यांना याचा मोठा लाभ होणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.