* जवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : सैनिकांतूनही उपक्रमाचे स्वागत
शिवानंद पाटील । गडहिंग्लज : स्वत: सैनिक नाही अन् नातेवाईकांमध्येही कोणी सैनिक नाही. मात्र, सीमेवर निधड्या छातीने शत्रूशी दोन हात करणाऱ्या व अहोरात्र डोळ्यांत तेल घालून देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या आदरापोटी दुगूनवाडीच्या मंगेश सोनार यांनी खास सैनिकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सैनिक व देशप्रेमींतून कौतुक होत आहे.
दुगुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मंगेश सोनार यांनी जवानांना अभिमामाने घरापासून ते रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा बसस्थानकापर्यंत स्पेशल गाडीने पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मंगेश व त्यांचे सहकारी अनुपम शिखरे हे सैनिकांना इच्छित ठिकाणापर्यंत सोडण्याचे काम करत आहेत. त्याबदल्यात ते कोणताही मोबदला घेत नाहीत. केवळ संबंधित सैनिकांनी बळजबरीने काही दिले तरच ते स्वीकारतात.
एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्याचे पार्थिव घरी येऊन अंत्यविधी होईपर्यंत गावकऱ्यांसह सीमाभागातील अनेकजण शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धीर देतात. मात्र, एखादा जवान सुटीवर गावी येताना किंवा पुन्हा सुट्टी संपवून देशसेवेसाठी जाताना त्यांना धीर देण्यासाठी कुटुंबीय सोडून कोणीही नसतात.
-----------------------------------
प्रतिक्रिया
स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी न करता देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे. सुट्टी संपवून पुन्हा सीमेवर जाणाऱ्या अनेक जवानांना सोडण्यासाठी जात असताना त्यांच्या व्यथा ऐकून क्षणभर त्यांच्याबद्दल अभिमानही वाटतो अन् मनही भरून येते.
- मंगेश सोनार, दुगूनवाडी (ता. गडहिंग्लज)
-----------------------------------
* ८ दिवसांत ११ जणांना सेवा
मुंबई येथील २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहून मंगेश यांनी या सेवेचा प्रारंभ केला. त्यांनी ८ दिवसांत गडहिंग्लज, शिप्पूर, बुगड्डीकट्टी, हसूरसासगिरी, निपाणी, नेसरी, लिंगनूर येथील ११ जवानांना बेळगाव व कोल्हापूरच्या विमानतळ व रेल्वेस्थानकापर्यंत सेवा दिली आहे.
-----------------------------------
फोटो ओळी : लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथून सुट्टी संपवून देशसेवेसाठी जाणारे जवान विशाल घुगरे यांना बेळगाव विमानतळापर्यंत खास वाहनातून सोडण्यासाठी मंगेश सोनार आपल्या कुटुंबीयांसह लिंगनूरमध्ये आले. यावेळी सेवानिवृत्त सुभेदार रावसाहेब पाटील यांनी सोनार कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी जवान बसवराज पाटील, राहुल पाटील, दीपक देवार्डे व उत्तम जोशिलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रमांक : ०४१२२०२०-गड-०१
-----------------------------------