सांगली : कवठेएकंदमधील स्फोटासारखी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी जिल्ह्यातील फटाके उत्पादित करणाऱ्या कारखान्यांसाठी लवकरच सुधारित नियमावलीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे फटाके निर्माण करणाऱ्या कारखान्यात नुकताच स्फोट होऊन अकराजण मृत्युमुखी पडले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे दसऱ्याला कवठेएकंद येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. ही पध्दत बंद करणे योग्य होणार नाही. परंतु फटाके तयार करताना संबंधितांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. सुरक्षेचे नियम आणि अटी यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन जागरुक राहणार आहे. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये यासाठी सुधारित नियमावली अंमलात आणण्यात येणार आहे. साधारणत: जिल्ह्यातील फटाके निर्मिती होणाऱ्या कारखान्यात कामगारांची संख्या कमी असल्याने तेथे कामगार कायदा लागू होऊ शकत नाही. त्यामुळे दुर्घटना झाली, तर त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना विम्याचे सुरक्षा कवच मिळत नाही. भविष्यात कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. दसरा सणाच्या पूर्वी कवठेएकंद गावातील फटाके निर्माण करणारे कारखानदार, गावकरी यांच्याशी प्रशासकीय अधिकारी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. तसेच फटाके विक्रेत्यांना देखील परवाने देताना त्यांची काटेकोर अंमलबजावणी कशी होईल याकडे पाहिले जाईल, असेही जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)फटाके साठाप्रकरणी सहा व्यापाऱ्यांवर गुन्हे फटाक्यांचा साठा करुन सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्याने सांगली व माधवनगरमधील सहा व्यापाऱ्यांविरुद्ध संजयनगर व विश्रामबाग पोलिसांत सोमवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. संजय मालाणी, सुरेश मालाणी, दत्तात्रय मटबुले, ललितकुमार बेदमुथा (सर्व रा. माधवनगर), अशोक मालाणी (उत्तर शिवाजीनगर), अजित पोरे (रेव्हेन्यू कालनी, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. कवठेएकंद येथील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासणीत हे व्यापारी दोषी आढळले.
फटाक्यांसाठी सुधारित नियमावली
By admin | Updated: May 11, 2015 23:47 IST