कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या ‘वज्रलेप’ विषयावर आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत वज्रलेप समितीचे सचिव अॅड. दिलीप मंगसुळे यांनी वज्रलेप समितीवर अध्यक्षाची नेमणूक व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे म्हणणे न्यायालयासमोर मांडले. पुढील सुनावणी १३ जानेवारीला होणार आहे. देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या वज्रलेपावरील निर्णयात वज्रलेप समितीच्यावतीने ही समितीच अस्तित्वात नसल्याचे म्हणणे मांडले होते. दुसरीकडे, देवस्थानने वज्रलेप समितीच अस्तित्वात नसल्याचे पत्र सादर केले आहे. या प्रकरणात ‘देवस्थान समिती वज्रलेप समितीचे अध्यक्ष एस. व्ही. नेवगी यांचे निधन झाल्याने सदर समिती संपुष्टात आलेली आहे (अस्तित्वात राहिलेली नाही)’ असे म्हणणे मांडले होते. त्यानंतर सदस्यांनी वैकल्पिक वाद निवारण केंद्रात सुरू असलेल्या सुनावणीला अनुपस्थित राहून देवीबद्दल अनास्थाच दर्शविली आहे, असा आरोप श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी केला होता.मात्र, आज झालेल्या सुनावणीस देवस्थान समितीचे सचिव विक्रांत चव्हाण आणि वज्रलेप समितीचे सचिव अॅड. दिलीप मंगसुळे यांच्यासह अॅड. केदार मुनीश्वर ,गजानन मुनीश्वर, अजित ठाणेकर उपस्थित होते. यावेळी विक्रांत चव्हाण व मंगसुळे यांनी अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी आम्ही सगळेच सकारात्मक विचार करीत आहोत. मात्र, वज्रलेप समितीवर अध्यक्ष नसल्याने हा विषय थांबला आहे; त्यामुळे आम्ही लवकरच समितीवर अध्यक्षाची नेमणूक व्हावी यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले.
वज्रलेप समितीवर तातडीने अध्यक्ष नेमू
By admin | Updated: December 24, 2014 00:20 IST