कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेतील सत्तारूढ मंडळींच्या गैरकारभाराचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. आम्ही केलेले आरोप खोटे ठरवा; पतसंस्थेच्या निवडणुकीतून माघार घेतो, असे उघड आव्हान प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले. ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या आगामी निवडणुकीसाठी राजर्षी शाहू लोकशाही आघाडी समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. एम. पाटील होते. आरोप करताना आपण शिक्षक आहोत याचे भान ठेवावे. अशा टीकेला कोणीही उत्तर देऊ नये, असे आवाहन करीत प्र्रा. जयंत आसगावकर म्हणाले, आपण संस्थाचालक असल्याची टीका केली जाते; पण पहिल्यांदा मी सभासद झालो आणि त्यानंतर संस्थाचालक झालो, याचे भान विरोधकांनी ठेवावे. सत्तेत असताना पतसंस्थेत कधीही लुडबूड केली नाही. आगामी काळात चांगली मंडळी सोबत येण्यास तयार असतील तर त्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ. आम्हाला नेतृत्वाची हाव नाही. सक्षम नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. बाबा पाटील म्हणाले, कृती समिती फोडण्यासाठी काहींना आमिषे दाखविली आहेत; पण कृती समितीमधील प्रत्येक घटकाचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध असल्याने समिती अभेद्यच राहील. चुकीच्या कारभाराला विरोध करीत आठ संचालकांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत संचालक संजय पाटील म्हणाले, सत्तारूढ गटाच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे निवडणुकीत पुराव्यानिशी काढू. एका शाळेतील शिक्षकांना कमी करून संस्थाचालकाने नवीन शिक्षकांच्या नेमणुका केल्या; पण जुने शिक्षक थकबाकीदार असताना नवीन शिक्षकांना कर्जवाटप करण्याचा प्रताप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. अशा अनेक भानगडी आपल्याकडे असून सगळा पर्दाफाश करू, असा इशाराही पाटील यांनी दिला. सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, मिलिंद पांगरेकर, नरेंद्र कांबळे, रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव देशमुख, चंद्रकांत लाड, एस. एम. नाळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीस गोविंद पानसरे व आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २० कोटींच्या तरलतेवर १२ कोटींचे कर्जपतसंस्थेच्या ठेवी वाढल्याचा डांगोरा काही मंडळी पिटत आहेत; पण २० कोटी तरलतेवर जिल्हा बॅँकेकडून १२ कोटींचे कर्ज घेण्याची वेळ का येते ? १६४ कोटी ठेवींवर आठ कोटी तरलता कशी ? असा प्रश्न करीत संचालक संजय पाटील यांनी सडकून टीका केली. सत्ता द्या; १२ टक्के व्याजदरसभासदांनी एकहाती सत्ता द्यावी, १२ टक्के कर्जाचा व्याजदर व कर्जमुक्तीचा संपूर्ण निधी तत्काळ परत केला जाईल, अशी ग्वाही प्रा. आसगावकर यांनी दिली.
आरोप खोटे ठरले, तर निवडणुकीतून माघार
By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST