कळंबा : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशे, ध्वनी आणि आवाजाच्या प्रदूषणास फाटा देत मोठ्या उत्साहात घरगुती गणेशाचे शुक्रवारी आगमन झाले. मंगळवारी घरगुती गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनासह कळंबा, पाचगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घरगुती गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी यंदाही नियोजन केले आहे.
गतवर्षी कळंबा तलावात एकही गणेशमूर्ती विसर्जित होऊ न देता जवळपास सात हजार गणेशमूर्ती, दीड टन निर्माल्य पालिका आणि कळंबा पाचगाव ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संकलित करण्यात आले होते.
यंदा पालिकेच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून शहरासह उपनगरातील प्रत्येक प्रभागात कृत्रिम विसर्जनाची आणि निर्माल्य संकलनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती घरच्या किंवा सोसायटीच्या स्तरावर विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कळंबा तलाव प्रदूषणमुक्त राहावा यासाठी कळंबा आणि पाचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येकी सात ट्रॅक्टर आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, घरोघरी मूर्ती व निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे. करवीर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उपनगरात पालिकेने कृत्रिम तलाव उभारले असून, निर्माल्य संकलनाची सोय केली आहे. त्यामुळे तलावात मूर्ती अथवा निर्माल्य विसर्जित करण्यात येणार नाही, तरी कळंबा तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका कळंबा आणि पाचगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनाची स्थानिक परिसरात सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी कळंबा तलावात मूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह धरू नये. सामाजिक बांधिलकी जपत कळंबा तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे.
सागर भोगम, सरपंच, कळंबा