इचलकरंजी : शहर व परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाचे प्रमाण कमी होते. काही काळ पावसाने थोडी उसंत घेतली होती, तरीही पंचगंगा नदीची पाणीपातळी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता ६० फूट ६ इंचांवर होती, तर सायंकाळच्या सुमारास पाणीपातळी ६१ फुटांवर स्थिर होती. दिवसभर पावसाने उघडीप घेतल्याने पाणीपातळीत थोडीशी वाढ झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे चोवीस तासांत जवळपास तेरा फुटांनी पाणीपातळी वाढली आहे. शहर व परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे इचलकरंजीतील नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे येथील वरद विनायक व महादेव मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. काही नागरिक व युवक पूरपरिस्थिती पाहण्यासाठी येत आहेत, तसेच त्यांना मोह न आवरल्याने ते सेल्फी घेत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून त्यांना सक्त मनाई केली जात आहे. नदी पुलावर कर्मचाऱ्यांना पाचारण केले असून, बेजबाबदार नागरिकांना सूचना देत, हाकलून दिले जात आहे.
1) इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतीरी असलेल्या वरदविनायक मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे.