इचलकरंजी : शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात गरजेनुसार लसीचा पुरवठा केला जाईल. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी कॉन्टॅक्ट टेस्टिंगवर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये कर्मचा-यांच्या दर पंधरा दिवसाला चाचण्या घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सद्य परिस्थिती संदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी आढावा बैठकीत शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने मुबलक स्वरूपात पुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यास पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. सध्या एका कोरोना रुग्णामागे पाच जणांचे टेस्टिंग केले जात असून त्यात वाढ करत दहा होणार आहे. तर औद्योगिक कारखाने, आस्थापना याठिकाणी दर पंधरा दिवसांनी कर्मचा-यांची एचआरटीसी टेस्ट बंधनकारक करण्यात येणार आहे. प्रशासनास सहकार्य न करणाऱ्या आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.