लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी केली आहे. काही नियम व अटींवर बाजारासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, येथील थोरात चौकासह अन्य ठिकाणी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन असल्याने शुक्रवारी भाजीपाला व अन्य साहित्य खरेदीच्या निमित्ताने नागरिकांची झुंबड गर्दी उसळली होती. शहरातून कोरोना गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
पावसाने दिवसभर थोडी उसंत घेतल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले, तर अत्यावश्यक सेवासह अन्य आस्थापने निम्मे शटर उघडून सुरू होती. मात्र, प्रशासनाने नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असल्याने शुक्रवार आठवडी बाजाराच्या निमित्ताने सकाळपासूनच नागरिकांनी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. पावसाळ्यामुळे छत्री, रेनकोट, टोपी खरेदीबरोबरच छत्री दुरुस्तीसाठी जागोजागी गर्दी झाली होती. काही ठिकाणी निम्मे शटर उघडून, तर काही भागात खुलेआम दुकाने सुरू करून ग्राहकांना हव्या त्या वस्तू दिल्या जात होत्या. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. बाजारात कोरोना महामारीचे गांभीर्य नसल्याचे दिसत होते.
फोटो ओळी
१८०६२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजीत आठवडी बाजारात गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.