इचलकरंजी : कोरोनाचे संकट घोंघावत असताना, जिल्ह्यातील मंत्र्यांकडून मात्र इचलकरंजीला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे आयजीएमसारख्या चांगल्या आरोग्यसेवेचा खेळखंडोबा होत आहे. यापूर्वी दिलेल्या आश्वासनाचा पालकमंत्र्यांना विसर पडला असून, मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा घणाघाती आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. जनतेला राजकारण नको, तर उपचार हवे असून, संकटसमयी सहकार्य मिळत नसेल, तर प्रसंगी रस्त्यावरचा संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असताना, आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आमदार आवाडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, रुग्णालय इमारत व स्टाफ क्वॉर्टर्स इमारत दुरुस्तीसाठी राज्य शासनाने १८.३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १२.७६ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून, लवकरच कामे सुरू होतील. एकीकडे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे सुविधांयुक्त व आवश्यक सेवांसह सज्ज होत असताना, शासनाकडून मात्र ते चांगले चालावे, असे वाटत नसावे. पालकमंत्र्यांनी गतवर्षी प्रांत कार्यालयातील बैठकीत रुग्णालयात अतिरिक्त ६ हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक देण्यासह सिटीस्कॅन मशीन देण्याची व बेडची क्षमता वाढविण्याची ग्वाही दिली होती. पण आजतागायत पूर्तता झालेली नाही.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे स्टाफ अपुरा पडत असून, त्या ४२ कर्मचार्यांना सामावून घेण्यास राज्य शासनाची कसलीही हरकत नसताना, जिल्ह्यातील मंत्रिमहोदयांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्टाफ तयार आहे, त्यांना राजकारण बाजूला ठेवून सामावून घ्यावे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे ३०० बेडचे केल्यास येथे मेडिकल व नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास कसलीही अडचण येणार नाही. परंतु जाणूनबुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मी चांगले काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये राजकारण आडवे येत आहे. मी काही तक्रार अथवा सूचना मांडण्याचा प्रयत्न केल्यास आरोप करत असल्याची टीका केली जाते.
कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीत ३० ऑक्सिजनसह ७५ बेडचे छोटे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. परंतु तेथे स्टाफ द्यावा लागणार यासाठी त्याची नोंद करून घेण्यास नकारघंटा दर्शविली जात आहे. त्याची जबाबदारी कोणीच घेण्यास तयार नाही, हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. जर सुविधा देण्यास, आवश्यक सेवा पुरविण्यास जमत नसेल, तर तसे सांगा, जनतेची काळजी घेण्यास आम्ही खंबीर आहोत. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने राजकारण बाजूला ठेवून कोणताही दुजाभाव न करता सोयी-सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले.
पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, सुनील पाटील, संजय केंगार, दीपक सुर्वे, सचिन हेरवाडे, नरसिंह पारीक, सर्जेराव हळदकर आदी उपस्थित होते.
मदतीला नकार दुर्दैवी
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अत्यावश्यक असे १०० एनआयव्ही व्हेंटिलेटर कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँक व जवाहर साखर कारखाना यांच्यामार्फत देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी केवळ मागणीपत्र देण्यास सांगितले असताना, प्रांताधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मात्र त्यास नकार दर्शवत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
‘इचलकरंजीच्या जीवनदायिनीला मरणयातना’ या मथळ्याखाली शुक्रवार (दि. ०७) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची नागरिक व प्रशासनामध्ये दिवसभर चर्चा सुरू होती. याची दखल घेत आमदार प्रकाश आवाडे यांनी आयजीएम हॉस्पिटलच्या प्रश्नासंदर्भात तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.