लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेने शहरांतर्गत कचरा उचलणाऱ्या औरंगाबादच्या आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला अकरा लाख १० हजार १७६ रुपये जादा अदा केले आहेत. नगरपालिका आर्थिक अडचणीत असताना नगरपालिकेची बचत करण्याऐवजी ठेकेदाराला जादा पैसे अदा करण्याचा प्रकार गंभीर असल्याचा आरोप नगरसेवक शशांक बावचकर यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापनांतर्गत इचलकरंजी नगरपालिका वॉर्ड क्र. १ ते २६ मधील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, त्याची वाहतूक करून कचरा डेपोवर जमा करणे, तसेच पालिकेने पुरविलेल्या वाहनांची देखभाल, दुरुस्ती करणे या कामांची निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार सदर कंपनीला ठेका देण्यात आला आहे. कामाची मंजुरी सात कोटी ४८ लाख ७५ हजार ६४ रुपये असली तरी निविदा ही १४.४० टक्के कमी दराने म्हणजेच सहा कोटी ४० लाख ९३ हजार ५४ इतक्या रकमेला मिळालेली आहे.
निविदा समितीने डीपीआरमध्ये नमूद असलेले तीन रेफ्यूज कॉम्पॅक्टर खरेदी करण्यात न आल्याने अंदाजपत्रकात ग्राह्य धरलेला सर्व खर्च हा वजा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये चालक पगार, हेल्पर पगार, मेन्टेनेन्स चार्जेस, इंधनावरील खर्च व ओव्हरहेड चार्जेस, असे एकूण ६६ लाख ६१ हजार ६३ रुपये अंतिम निविदा रकमेतून वगळणे आवश्यक आहे. त्यामुळे सदरची रक्कम वजा केली असता वार्षिक पाच कोटी ७४ लाख ३१ हजार ९९२ रकमेची निविदा मान्य केलेली आहे. तथापि, ठेकेदार कंपनीकडून जानेवारी व फेब्रुवारी २०२१ ची देयके नगरपालिकेकडे जमा झालेली असून, ती अदा केलेली आहेत. यामध्ये तीन कॉम्पॅक्टरवरील खर्च वजा करण्यात आलेला नाही.
नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी, लेखापरीक्षक व लेखापाल यांनी ही सर्व देयके नेमकेपणे तपासणी करणे आवश्यक होते; परंतु तसे न झाल्याने ठेकेदार कंपनी, प्रशासन व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम चालू असल्याचे बावचकर यांनी म्हटले आहे.