कोल्हापूर : अंबाबाईचा लाभलेला आशीर्वाद आणि शाहू महाराजांचे समतेचे विचार पुढे जपणाऱ्या आपल्या कोल्हापूरला पुढे न्यायची जबाबदारी माझी आहे. कोल्हापूरकरांच्या मनातलं ‘स्मार्ट कोल्हापूर’ घडविण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन सतेज पाटील यांनी केले. रमणमळा येथील काँग्रेसचे उमेदवार संदीप ऊर्फ पप्पू सरनाईक यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरला स्मार्ट बनविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले. स्वच्छ व मुबलक पाणी देणारी योजना येणाऱ्या दोन वर्षांत पूर्ण करणारच, हा माझा निर्धार आहे. ‘ई गव्हर्नस’च्या माध्यमातून मोबाईल अॅपद्वारे महापालिकेचा कारभार लोकाभिमुख करणार आहे. तरुणांसाठी रोजगार, वाय-फाय सिटी, मल्टिलेवल पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षित शहर, महिलांसाठी स्वच्छतागृहे, कचरामुक्त शहर, वाहतुकीचे नियोजन याला प्राधान्य असेल. ज्यांच्यासाठी मते मागायला मी तुमच्याकडे आलो. त्यांनी निवडणुकीनंतर तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असायला हवे हा माझा आग्रह आहे. त्यासाठी निवडणुकीनंतर ज्या वॉर्डात काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील, त्या ठिकाणी प्रत्येक सहा महिन्याला वॉर्ड मिटिंग घेऊन नगरसेवकांनी काय काम केले?, जनतेच्या काय सूचना आहेत, हे जाणून घेणार आहे. या प्रत्येक मिटिंगला मी स्वत: उपस्थित राहीन. कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून माझ्यासारखा तरुण काम करत आहे. आजपर्यंत जनतेचे आशीर्वाद, प्रेम, पाठबळ मला लाभले आहे. तुमच्यासारखी जोडलेली माणसे हेच माझे आयुष्याचे संचित आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. यासाठी काँग्रेस पक्षाला बहुमत द्या, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. सुरेश कुराडे म्हणाले, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे काँग्रेससोबतच आहेत. मात्र, विरोधक त्यांच्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. यावेळी सुरेश उलपे, सुरेश कुसळे, श्रीनिवास सोरटे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.‘फिरंगाई’ला ‘स्मार्ट’ करण्यासाठी तेजस्विनी इंगवलेंची गरज : पाटीलकोल्हापूर : शिवाजी पेठ परिसरातील फिरंगाई प्रभाग क्र. ४७ मधून विद्यमान नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी आपल्या दोन तपांतील नगरसेवकपदाच्या कार्याच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्या पत्नी तेजस्विनी इंगवले यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. फिरंगाई परिसर ‘स्मार्ट’ व्हावा, असे नागरिकांना वाटत असल्यानेच इंगवले यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले यांना प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे, असे उद््गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला नसता तर रविकिरण इंगवले यांनी येथून विजयाची हॅट्ट्रिक केली असती, असाही विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. इंगवले यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यांच्या जोरावर त्यांच्या मागे परिसरातील सर्व जनता राहणार असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रभागात २०१५-२०२० या कालावधीत गांधी मैदानाचे अत्याधुनिकीकरण, गांधी मैदानातील अत्याधुनिक जीम, गांधी मैदान हॉलमध्ये फक्त महिलांकरिता योगासन तसेच निसर्ग उपचार केंद्रांची स्थापना करणे, शिवाजी पेठेत निवृत्ती चौकातील शिवाजी पुतळ्याचे सुशोभीकरण करणे तसेच खरी कॉर्नर, अवचित पीर तालीम परिसर, विद्यार्थी कामगार चौक येथे हायमास्ट लॅम्पच्या उभारणीचा संकल्प असल्याचेही रविकिरण इंगवले यांनी सांगितले. यावेळी ताराराणी आघाडीच आपल्या प्रभागातील जनतेला न्याय देऊ शकेल, असा विश्वास रविकिरण इंगवले यांनी व्यक्त करून पत्नी तेजस्विनी इंगवले यांना मैदानात उतरविल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
‘स्मार्ट कोल्हापूर’साठी मी वचनबद्ध : सतेज पाटील
By admin | Updated: October 31, 2015 00:24 IST