कऱ्हाड : तालुक्यातील दोन युवकांचे छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातून अपहरण झाल्याचे समजताच संबंधित युवकांचे पालक धास्तावले. सलग पाच तास त्यांनी आपल्या मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातूनही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेर दुपारी संबंधित युवक सुखरूप असल्याचे व नक्षलवाद्यांनी त्यांची सुटका केल्याचे समजताच पालकांचा जीव भांड्यात पडला.कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे येथील श्रीकृष्ण पांडुरंग शेवाळे हा शिक्षणानिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. श्रीकृष्णचे वडील पांडुरंग शेवाळे हे शिक्षक असून, ते पत्नी व इतर कुटुंबीयांसमवेत कऱ्हाडनजीक कोयना वसाहतीमध्ये वास्तव्यास आहेत. तर श्रीकृष्ण पुणे येथे इतर नातेवाइकांसमवेत राहतो. काले येथील आदर्श दीपक पाटील हा युवकसुद्धा पुणे विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील दीपक पाटील हे कऱ्हाडातील यशवंत हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. पदवीचे शिक्षण घेतानाच आदर्श हा ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करतो. विकास वाळके नावाचा आणखी एक युवक पुण्यात वास्तव्यास आहे. श्रीकृष्ण, आदर्श व विकास हे तिघेजण मित्र असून, ते नक्षलग्रस्त भागात शांततेचा संदेश देण्यासाठी २२ डिसेंबर २०१५ रोजी पुण्यातून नागपूरला व तेथून गडचिरोली भागात गेले. तेथून ‘भारत जोडो’ अभियानांतर्गत सायकलवरून प्रवास करीत छत्तीसगडमधील भैरमगदमधून सुकमामार्गे ओडीशाच्या कालाहांडी मलकानगिरीवरून १० जानेवारी रोजी बालिमेलात व पुढे विशाखापट्टणमला पोहोचण्याचा या तिघांचा मानस होता. गेल्या काही दिवसांत ते छत्तीसगडमधून बिजापूरच्या बेदरे व कुटरू भागापर्यंत पोहोचले होते. अशातच जगदलपूरजवळील बिजापूर ते बासागुडा मार्गावरून या तिघांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची माहिती रविवारी सकाळी समोर आली. या माहितीने प्रशासकीय यंत्रणेसह श्रीकृष्ण व आदर्शचे कऱ्हाडातील पालक हादरले. प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात या युवकांची शोधमोहीम सुरू केली. तर पालकांनी आपल्या मुलांशी संपर्क साधण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला. कोयना वसाहतीत राहणाऱ्या श्रीकृष्णच्या नातेवाइकांना टीव्हीवरील बातम्यांतून आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे समजले. ही माहिती मिळताच नातेवाइकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी श्रीकृष्णच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, त्याच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांनी पुण्यातील नातेवाइकांशी संपर्क केला. मात्र, त्यांनाही श्रीकृष्ण सध्या कोठे आहे, याची निश्चित माहिती नव्हती. अशातच सुहास पाटील, संभाजी थोरात यांनी फलटणचे नगरसेवक अनुप शहा यांच्याशी संपर्क साधला. अनुप शहा यांची छत्तीसगडमध्ये ओळख आहे. तेथील काहीजणांचे संपर्क क्रमांक मिळवून श्रीकृष्णच्या कुटुंबीयांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांनी छत्तीसगडमधील बस्तर, बिजापूर, जगदलपूर, सुकमा या जिल्ह्णांतील प्रत्येक पोलीस ठाण्यात आई-वडिलांनी फोन केला. मात्र, त्यांना श्रीकृष्णचा ठावठिकाणा लागला नाही. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत श्रीकृष्णची माहिती मिळविण्यासाठी नातेवाईक धडपडत होते. अखेर सुकमा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातून दुपारी नातेवाइकांना फोन आला. श्रीकृष्ण याच्यासह त्याचे दोन मित्र सुखरूप असल्याचे व ते सध्या बस्तार पोलिसांजवळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)सातारा पोलीसही ‘अलर्ट’कऱ्हाड तालुक्यातील दोन युवकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची माहिती सातारा पोलिसांना सकाळी मिळाली. दोन्ही युवकांची संपूर्ण माहिती तातडीने सादर करण्याची सूचनाही येथील पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार जिल्हा पोलिसांच्या पथकाने अपहृत युवकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती मिळविण्यास सुरुवात केली. दुपारी माहिती संकलित होऊन वरिष्ठांकडे पाठविण्यापूर्वीच युवकांची सुखरूप सुटका झाल्याचे पोलिसांना समजले.
हुरहूर अन् काळजीचे पाच तास!
By admin | Updated: January 4, 2016 00:49 IST