चंदगड तालुक्याला तौक्ते वादळाचा मोठा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून भुईमूग, मका, उन्हाळी भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ताम्रपर्णी व घटप्रभा नदीच्या पाण्यात कमालीची वाढ होऊन नदीकाठावरील शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी पाणीपातळी खाली गेल्याने नदीपात्रात बसविलले वीजपंप अचानक वाढ झालेल्या पातळीमुळे पाण्याखाली गेले. त्यामुळे नदीकाठचे शेकडो वीजपंप निकामी झाल्याची शक्यता आहे. हे पंप दुरुस्तीशिवाय वापरात येत नाहीत. पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गेल्या तीन वर्षापासून चंदगड तालुक्यातील शेतकरी महापूर व ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहेत. शनिवारी व रविवारी झालेल्या वादळी पावसाने त्या नुकसानीत भर पडली. शासनाने त्याचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी अर्जुन ढेरे (डुक्करवाडी) यांनी केली आहे.