कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतीतील फौंड्रीत काम करताना उकळलेला रस अंगावर पडून कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. प्रकाश दिनकर पोतदार (३०, रा. सुधाकर जोशीनगर) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेची जबाबदारी फौंड्री मालकाने स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी व संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत मित्र व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे सीपीआर रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागासमोर काहीकाळ तणाव निर्माण झाला.
प्रकाश पोतदार हे गेली दहा ते बारा वर्षांपासून काम करीत होते. बुधवारी मध्यरात्री बारा ते सकाळी आठ या सत्रात त्यांची ड्युटी होती. काम करीत असताना त्यांच्या अंगावर तप्त लोहाचा रस पडला. त्यात ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती नातेवाईक व मित्र परिवारास समजली. त्यामुळे पहाटेपासूनच सीपीआरमध्ये गर्दी झाली. संबंधित फौंड्री मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मालकाने जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत ठिय्या आंदोलन मांडले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, विजयसिंह खाडे, गुणवंत नागटिळे, शिवाजी शेटे, संजय गुदगे, प्रभाकर गायकवाड, प्रदीप मस्के, दिग्विजय मगदूम, सचिन आडसूळ आदी सहभागी होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल लोखंडे व सुनीता शेळके यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस फौंड्री व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर दुपारी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोतदार यांच्या पश्चात पत्नी, आई, चार वर्षांचा मुलगा आहे.
चौकट
सुधाकर जोशीनगरात हळहळ
संभाजीनगरातील सुधाकर जोशीनगरात पोतदार हे आई, पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासोबत राहतात. कुटुंबीयातील ते कर्ते पुरुष होते. त्यांच्या जाण्याने पोतदार कुटुंबाचा आधारच हरपला. त्यामुळे सुधाकर जोशीनगरात गुरुवारी दिवसभर वातावरण शोकाकूल होते.
फोटो : २१०१२०२१-कोल-प्रकाश पोतदार-फायर
फोटो : २१०१२०२१-कोल-फौंड्री०१, ०२
ओळी : कोल्हापुरातील शिरोली औद्योगिक वसाहतीतील फौंड्रीमध्ये मध्यरात्री तप्त रस अंगावर पडून मृत्यू पडलेले प्रकाश पोतदार यांची जबाबदारी फौंड्री प्रशासनाने घ्यावी या मागणीसाठी नातेवाईक व मित्रांनी सीपीआरमध्ये मृत्यदेह ताब्यात घेण्यास नकार देत ठिय्या मारला होता.
(छाया : नसीर अत्तार)