लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आशा, गटप्रवर्तकांना दहा महिन्यांचा थकीत प्रोत्साहन भत्ता त्वरित मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली. आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी ठिय्या मारून नगराध्यक्षा अलका स्वामी यांना, मागण्या तत्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स, गटप्रवर्तक युनियनच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आंदोलकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला व घोषणा देत निदर्शने केली. त्यानंतर नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. ११६ आशा, गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा नाही. अत्यल्प मानधन मिळते. कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा केली. तरीही पालिकेने दहा महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता अद्याप दिला नाही. तो ताबडतोब द्यावा. २५ आशा वर्कर्समागे एक गटप्रवर्तक नेमावा. दिवाळी मानधन म्हणून दोन महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशा मागण्या त्यामध्ये केल्या.
यावेळी अशोक स्वामी, विठ्ठल चोपडे, सदा मलाबादे उपस्थित होते.