एक महिन्यापूर्वी क्रोएशिया येथे झालेल्या जागतिक विश्वचषक स्पर्धेत कोल्हापूरची राही सरनोबत हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात अव्वल स्थान पटकाविले होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या ऑलिम्पिकमधील दुसऱ्या फेरीत तिचे दोन खराब नेम लागल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी कोल्हापूरची दुसरी सुवर्णकन्या अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत हिचेही आव्हान संपुष्टात आले. शनिवारी सकाळी झालेल्या स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात वाय. झिकोवा (आरवोसी) हिने ११८२ गुण मिळवत प्रथम, तर एस. मेंडलेना हिने ११७८ गुण आणि जे. बीर (जर्मनी ) हिने ११७८ गुण मिळवत तिसरे स्थान पटकाविले. तेजस्विनी ११५४ गुण मिळवून ३३ व्या स्थानावर राहिली. एकूण स्पर्धेत ३७ देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तिच्यासोबत भारताची दुसरी नेमबाज एस. मौदगिल हिने ११६७ गुण मिळवून १५ वे स्थान पटकाविले. मात्र, पुढील फेरीत पोहोचण्यासाठी पहिल्या ८ स्पर्धकांचाच विचार होत असल्याने भारतीय नेमबाजांचे या प्रकारातील आव्हान संपुष्टात आले.
आता आशा ‘स्वरूप’च्या कामगिरीवर
टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या नगरीत पॅराॅलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे. यात कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकरही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. तो १० मीटर एअर रायफल प्रकारात आपले नशीब आजमावणार आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत त्याने पॅरालिम्पिक स्पर्धेपर्यंतचा प्रवास गाठला आहे. विशेष म्हणजे त्याची आई आर.के.नगरातील खडीचा गणपती मंदिरासमोर कापूर, उदबत्ती विकून त्याच्यासह आपला उदरनिर्वाह करीत आहे. आतापर्यंतच्या त्याच्या दमदार कामगिरीमुळे तो निश्चितच देशासाठी पदक जिंकेल, अशी आशा कोल्हापूरवासीयांकडून व्यक्त होत आहे.