सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रविवारी रात्री उशिरा यश आले. सांगलीतील सूत्रधार हाती लागला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. यातून आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपुरात छापे टाकले आहेत. दत्तवाड (ता. शिरोळ) येथे बनावट नोटा छपाईचा कारखाना दोन दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आला होता. नोटा मिरजेत खपविण्यासाठी आलेल्या ऐनुद्दीन ढालाईत यास रंगेहात पकडून त्याच्याकडून सुमारे ३४ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आतापर्यंत टोळीतील सुभाष पाटील, रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत यांना अटक केली आहे. त्यांच्यामागे सांगलीतील सूत्रधार असल्याचे निष्पन्न होताच तपासाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. चौघे पोलिसांच्या हाती सापडल्याचे समजताच सूत्रधाराने पलायन केले होते. अखेर त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. त्याच्या सांगण्यावरून दत्तवाडमधील चौघांनी नोटांची छपाई केल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेतलेल्या सूत्रधारासह चौघांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. त्यांच्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. दत्तवाडमधील चौघे दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने तपास वेगळ्या दिशेने जात आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांपुरताच मर्यादित तपास आहे. कोल्हापूर पोलिसांचीही तपासांत मदत घेण्यात आली आहे. जयसिंगपूर व इचलकरंजीतील काहीजणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी दुपारी पथक रवाना झाले होते. संशयित सापडल्यानंतर तपासाला गती मिळेल. (प्रतिनिधी)दोन दिवसांत उलगडापोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट म्हणाले की, तपासाची व्याप्ती वाढत आहे. ज्यांची नावे निष्पन्न होतील, त्यांना ताब्यात घेतले जात आहे. टोळीत आणखी दोघा-तिघांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला जाईल.
बनावट नोटांचा सूत्रधार ताब्यात
By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST