मलकापूर : मलकापूर शहरातून गेलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाची दुरवस्था झाली असून रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. येत्या पंधरा दिवसांत रस्ता डांबरीकरण न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मलकापूर शहर विकास आघाडीच्यावतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग मलकापूर शहरातून गेला आहे. गेली दोन वर्षे रस्त्यात खड्डे पडले असून, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीच्या लोटच्या लोट हवेत पसरून स्थानिक व्यापाऱ्यांना याचा त्रास होत आहे. वाहनांचे अपघातदेखील होत आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. तरी संबंधित प्रशासनाने पंधरा दिवसांत रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शहर विकास आघाडीचे विरोधी नगरसेवक सुधाकर पाटील यांनी दिला आहे.निवेदनावर सेनेचे शहरप्रमुख सागर सणगर, नगरसेवक संजय मोरे, शौकत कळेकर, विनायक कुंभार, महेंद्र मोरे, विश्वास कांबळे आदींसह व्यापारी, नागरिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या दुरूस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: November 12, 2014 23:26 IST