अडरे/चिपळूण : भोंदूगिरीचे बिंग फुटू नये व माउलीच्या करिष्म्याचा भक्तगणांवर प्रभाव पडावा, शिवाय आपल्यापासून दूर गेलेला भक्त पुन्हा आपल्या प्रवाहात यावा, यासाठी कापसाळ फणसवाडी येथील तथाकथित मठाधिपती वासंती कांबळी हिने आपल्या सहकाऱ्यांसह कामथे हुमणेवाडी येथून ७ वर्षीय बालकाचे बुधवारी अपहरण केले होते. तपासात याबाबतची कबुली कांबळी हिने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणी आणखी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कामथे हुमणेवाडी येथून प्रथम प्रकाश बाईत हा बालक बुधवारी दुपारी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. गुरुवारी कलावती आर्इंच्या मठात प्रश्नोत्तराच्यावेळी कामथे येथील महिलांनी प्रथम बेपत्ता झाला असल्याचे सांगितले. त्यावर वासंतीने मुलगा चार दिवसांत परत येईल आणि त्याला मीच सुरक्षित आणेन, असे सांगितले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मठाधिपती वासंती वसंत कांबळी (कापसाळ फणसवाडी), परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अलोरेचे शिक्षक मधुकर गणपती चिंदके (हळदी, कोल्हापूर) यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ते दोघे कोल्हापूर येथे फरशी आणण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मोबाईलवरून त्यांचे लोकेशन समजले. त्यानुसार पोलिसांनी चिंदके याला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चिपळूण पोलीस ठाण्यात बोलविले. शुक्रवारी सायंकाळी माउली कांबळी व शिक्षक चिंदके पोलीस ठाण्यात आले. यावेळी काही काळ हंगामा करण्यात आला. पोलिसांच्या नावे तळतळाटही झाला, परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली व रात्री चिंदके व माउली कांबळी यांना उशिरा अटक केली. आपला भक्तसंप्रदाय वाढावा व प्रथमचे वडील पुन्हा प्रवाहात सामील व्हावेत, आपले बिंग कुठे फुटू नये यासाठी माउली कांबळीचा आटापिटा होता. म्हणूनच तिने हे अपहरण नाट्य घडवून आणले होते. पोलिसांनी शनिवारी प्रथमला रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथून चिपळूण येथे आणले व त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. रविवारी याप्रकरणी सूरज दळवी (कामथे) याला अटक केली, तर मंगला प्रभाकर जावळे (४७, कामथे, जावळेवाडी) या महिलेला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. तिघा आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. १५पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रथमला त्याची मावशी मंगला जावळे हिने घरातून खाऊचे आमिष दाखवून महामार्गापर्यंत आणले असावे, असा संशय असून, तिने त्याला आरोपी सूरज दळवी याच्या स्वाधीन केले. सूरज याने संगमेश्वर, कोल्हापूर मार्गे मुंबईला कुर्ला येथे त्याला नेले. तेथे त्याने त्याला एका महिला भक्तगणाच्या स्वाधीन केले. या महिलेने प्रथमला शिक्षक चिंदके याच्या स्वाधीन केले. त्याने रेठरे बुद्रुक येथे त्याला बहिणीकडे ठेवले. तथाकथित माउली कलावती आईची भक्त वासंती कांबळी हिचा पाच हजार भक्तगण आहे. हा भक्तगण वाढावा यासाठी आपल्यात दैवी शक्ती आहे, ती सिद्ध व्हावी हे दाखविण्यासाठी व आपला मायावी पाश भक्तगणांच्या भोवती आवळण्यासाठी आपल्या शक्तीच्या जोरावर आपण प्रथम याला परत आणला हे दाखविण्यासाठी कांबळी हिने हा सर्व अपहरण नाट्याचा आटापिटा केला. प्रकाश बाईत यांना अद्दल घडविण्यासाठीच प्रथमचे अपहरण प्रकाश बाईत हे वासंती कांबळी यांच्याकडे गेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्यांच्या कामथे फणसवाडी येथील असणाऱ्या मठात भक्त म्हणून सेवा करीत होते. कामथे येथे असणाऱ्या नदीपात्रात कलावती आर्इंच्या पाऊलखुणा आहेत, त्या तेथून येऊन गेल्या आहेत, अशी वासंती कांबळी ही भक्तगणांना भासवत होती व त्यांची दिशाभूल करीत होती. हे पाऊल बोगस असल्याचे समजल्यानंतर गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रकाश बाईत तेथे जाण्याचे बंद झाले. प्रकाश यांच्यामुळे आपले बिंग फुटेल व आपली नाचक्की होईल, आपल्या भोंदूगिरीचा बुरखा फाटेल म्हणून त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्याचा तिने प्रयत्न सुरू केला. परंतु, त्यांनी दाद दिली नाही. प्रकाश यांना अद्दल घडविण्यासाठी भक्तगण बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मुलाचे वासंतीने अपहरण केले, असे उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी सांगितले. स्थानिक महिलांकडून समर्थन कापसाळ फणसवाडी येथे सिद्धकला मठाला भेट दिली असता तेथील स्थानिक महिला गोळा झाल्या. त्यांनी आमची माउली चांगली आहे. तिला बदनाम करण्यासाठी प्रकाश बाईत याने षड्यंत्र रचले आहे. उलट तो येथे येणाऱ्या भक्तांकडून उसनवारी पैसे घेत असे. हे न आवडल्याने माउलीने त्याला येथे येण्यास बंदी केली, असे सांगून माउलीचे समर्थन केले.
भोंदूगिरीचे बिंग फुटू नये म्हणून अपहरण
By admin | Updated: May 11, 2015 00:58 IST