कोल्हापूर : कसबा बावडा येथे प्रेमविवाहातून झालेल्या इंद्रजित कुलकर्णी व मेघा पाटील यांच्या ‘आॅनर किलिंग’ खटल्यासाठी नामांकित सरकारी वकिलांची नियुक्ती, संशयित आरोपींवर न्यायालयात तातडीने दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी बच्च्चे सावर्डे येथील ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी गृहपोलीस उपअधीक्षक अनिल पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. शहीद गोविंद पानसरे विचार मंचतर्फे मागण्यांचे हे निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील काही घटना संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करू, असे आश्वासन गृहपोलीस उपअधीक्षक पाटील यांनी दिले. बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून तिच्या दोन भावांसह तिघांनी मिळून कसबा बावडा येथे इंद्रजित कुलकर्णी व मेघा यांचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील गणेश महेंद्र पाटील व त्याचा भाऊ जयदीप पाटील व मित्र नितीन रामचंद्र काशीद (सातवे) यांना अटक केली आहे. याप्रकरणी शनिवारी शहीद गोविंद पानसरे विचार मंचच्या नेतृत्वाखाली बच्चे सावर्डे येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर पोलीस मुख्यालयात गृहपोलीस उपअधीक्षक अनिल पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. इंद्रजित व मेघा यांनी विवाह केला होता, त्यावेळी इंद्रजितचे मामा गणेश कुलकर्णी (रा. मंगळवार पेठ) यांना मेघाच्या कुटुंबीयांनी घरात घुसून पोलिसांसमोर मारहाण केली होती, तर सावर्डे येथे घरात जाऊन धमक्या दिल्या होत्या. त्यावेळी बांबवडे पोलिसांनी पक्षपातीपणा केला. त्यानंतर त्या जोडप्याला संरक्षण दिले असते तर खुनाची घटना टाळता आली असती; त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी इंद्रजित कुलकर्णी यांचे चुलते रघुनाथ कुलकर्णी यांच्यासह गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, सीमा पाटील, धनाजी सावंत, शशिकांत कुलकर्णी, रणजित कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘आॅनर किलिंग’ची उच्चस्तरीय चौकशी
By admin | Updated: December 20, 2015 01:44 IST