राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पाऊस कोसळला. साधारणता तेरा दिवसांत तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील ३४ हजार १६७ शेतकऱ्यांचे ९३७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने काढला आहे. प्रत्यक्ष पंचनाम्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. तीन महिन्यात शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा फटका बसला आहे.यंदा मे महिन्यापासूनच जिल्ह्याला वळीव पावसाने झोडपून काढले. ऐन उन्हाळ्यात उन्हाळी पिके कुजली होती. यामध्ये जिल्ह्यातील १० हजार २८४ शेतकऱ्यांचे १८६९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असे ३ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जून, जुलै महिन्यात पावसाने झोडपून काढले. या महिन्यात १० ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहिली. त्यानंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली असून सलग तेरा दिवस जोरदार पाऊस कोसळला.जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला, विशेष म्हणजे नदी, ओढ्या काठच्या पिकांमध्ये सलग आठ दिवस पाणी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचा नजर अंदाज केला असून ९३७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, सोमवारपासून स्थानिक पातळीवर पंचनाम्याचे काम सुरु झाले आहे. कृषी सहायक, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवकांना पंचनामा करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सरासरी पाऊसमहिना - पाऊस मिलीमीटर
- जून- ४१५.४
- जुलै- ३३१.७
- १ ते १० ऑगस्ट- २९.५
- ११ ते २५ ऑगस्ट- २४८.३
मे महिन्यातील मान्सूनपूर्व पावसाने झालेले नुकसानबाधित शेतकरी - क्षेत्र - हेक्टर नुकसान१०,२८४ - १८६९ - ३.४५ कोटी
ऑगस्टमधील अतिवृष्टी, पुराने नुकसानीचा नजर अंदाज
- बाधित गावे - ४३५
- शेतकरी संख्या - ३४,१६७
पिकनिहाय बाधित क्षेत्र हेक्टर -
- भात- १७७८.४५
- ऊस- ५९०७.२५
- सोयाबीन - ६६३
- नाचणी - ४३.४०
- भुईमूग - ६५५.४०
- भाजीपाला - १२७.८०
- फळपीक - ५२.३०
- फुलपिके - ३.००
पुराचे पाणी कमी होऊ लागल्याने सोमवारपासून पंचनाम्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. - जालिंदर पांगरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कोल्हापूर)