लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऐन मान्सूनमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. भात, भुईमूग पिकांनी माना टाकल्या आहेत. बुधवारी काेल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेली पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भात, भुईमूग, सोयाबीन पिके अडचणीत आली आहेत. राेज कडकडीत ऊन पडत असल्याने चिंता वाढली आहे. बुधवारी सकाळी तर रस्त्यावरून जाताना अंग भाजत होते. इतके कडक ऊन होते. या उन्हाने पिके करपू लागल्याने ती वाचवायची कशी? या चिंतेत शेतकरी आहेत.
बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यातील वातावरणात काहीसा बदल झाला. काही ठिकाणी पाऊस कोसळला, तर कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरण राहिले. आज, गुरुवारीही जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वळीव का असेना, पण पावसाचे वातावरण तयार झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवार (दि. ११) पासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
फोटो ओळी :
१) सांगरूळ परिसरात पाण्याअभावी माळरानावरील भात पिके अशी करपली आहेत. (फोटो-०७०७२०२१-कोल-शेती)
२) भुईमुगाचे पीक पिवळे पडू लागले आहे. (फोटो-०७०७२०२१-कोल-शेती०१)