आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १५ : जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरीसह पाच धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटापर्यंत गेली असून आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेले दोन -तीन दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू आहे.
पुर्वेकडील हातकणंगले, शिरोळ हे तालुके वगळता उर्वरित जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून खरीप पिकांना पोषक ठरत आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून रोप लागणीचे काम अंतिम टप्यात आली आहेत. धरणक्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी सुरू आहे.
राधानगरी धरणातून प्रति सेकंद ४००, कासारी मधून २५०, घटप्रभा मधून २९८०, जांबरे मधून ८११ तर कोदे मधून २८९ घन फुट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून पंचगंगेची पातळी २१ फुटापर्यंत पोहचली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड तर भोगावती नदीवरील खडक कोगे व कासारी नदीवरील यवलूज हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात एका घरांची अंशता पडझड होऊन सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर शहरात शनिवारी सकाळ पासून जोरदार सरी कोसळत आहेत. पाऊस थांबून थांबून येत असला तरी जोरदार सरी सगळीकडे पाणीच पाणी करत आहेत.
पावसाला गारठा!
या पावसाला कमालीचा गारठा आहे. पावसाच्या सरीबरोबर अंगाला बोचणारे वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. याचा वयोवृध्द नागरिकांना थोडा त्रास होत आहे. जूलैच्या सरासरीत ५४ टक्के पाऊस जूलै महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ५४.९६ टक्के पाऊस झाला आहे. शाहूवाडीत ९२ टक्के तर कागल मध्ये सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी हातकणंगले तालुक्यात ३४ टक्के पाऊस झाला आहे.