कोल्हापूर : मतदार यादी म्हटले की नाव चुकले, दुसऱ्याच मतदार संघात नाव, तर कधी मतदार यादीतून नावच वगळले, अशा अनेक तक्रारी येत असतात; मात्र कोल्हापूर जिल्ह्याची मतदार यादी अपडेट ठेवण्यात निवडणूक विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. नुकत्याच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील मतदार यादीतील एकही मतदार असा नाही की, ज्याच्या नावापुढे छायाचित्र नाही. शंभर टक्के मतदारांच्या नावापुढे छायाचित्र असून, मतदानासोबतच यादी अपडेट ठेवण्यातही कोल्हापूर अव्वल आहे. राज्यात असे काम फारच कमी जिल्ह्यांत झाले आहे.
विधानसभा, लोकसभा, पदवीधर किंवा विधान परिषद निवडणूक कोणतीही असली तरी मतदार यादी ही लागतेच. यादीत नाव व क्रमांक बघून मतदार मतदान केंद्रावर जातात. त्यांना मतदानाची स्लीप दिली जाते; मात्र अनेक मतदारांच्या नावापुढे छायाचित्र नसल्याने बोगस मतदान होण्याची शक्यता असते. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे असली तरी छायाचित्रावरून पटकन मतदानाची ओळख पटते. पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये या मतदार यादीतील नावापुढे छायाचित्रेच नाहीत. त्यामुळे तेथील प्रशासनाने मतदाराचे छायाचित्र नसेल तर मतदान यादीतून नाव वगळणार असल्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अशी स्थिती नाही. गेल्या तीन महिन्यांपूर्वी ८८ मतदारांच्या नावापुढे छायाचित्र नव्हते. जिल्हा निवडणूक विभागाने त्याची दखल घेत त्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांना कळवले. त्यांनी बीएलओंच्या मार्फत यंत्रणा लावून सर्व मतदारांच्या नावापुढे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
जानेवारी महिन्यात निवडणूक आयोगाने मतदार यादीचा अहवाल जाहीर केला असून, त्यात कोल्हापुरात मतदार यादीत छायाचित्र नसलेला एकही मतदार नाही, अशी नोंद करण्यात आली आहे.
----
दुबार नावे हीच डोकेदुखी
सध्या विभागापुढे दुबार नाव नोंदणीचीच मोठी अडचण आहे. अनेक मतदारांचे नाव दोन मतदारसंघांमध्ये आहे. ग्रामीण हद्दीत राहणारे अनेक लोक महापालिकेसाठी मतदान करून जातात. काही जण दोन्ही मतदारसंघात मतदान करून येतात. मुली लग्न होऊन सासरी अन्य गावी जातात, काही जणांचे मृत्यू होतात, वास्तव्याचे ठिकाण बदलते. या बदलांची सूचना देऊन मतदारांनी आपले आधीच्या ठिकाणचे नाव कमी करून राहत असलेल्या ठिकाणी लावणे गरजेचे असते; मात्र ही जागरुकता दाखवली जात नाही.
--
जिल्ह्यातील मतदार पुढीलप्रमाणे
विभागाचे नाव पुरुष महिला इतर एकूण
चंदगड : १ लाख ५९ हजार ७०८ : १ लाख ५९ हजार २०३ : - : ३ लाख १८ हजार ९११
राधानगरी : १ लाख ७० हजार ८०० : १ लाख ५८ हजार ०६१ : - : ३ लाख २८ हजार ८६१
कागल : १ लाख ६३ हजार ७८६ : १ लाख ६० हजार ८९० : १ : ३ लाख २४ हजार ६७७
कोल्हापूर दक्षिण : १ लाख ७१ हजार १०३ : १ लाख ६१ हजार ५३९ : ८ : ३ लाख ३२ हजार ६५०
करवीर : १ लाख ६० हजार ५३३ : १ लाख ४६ हजार ६५२ : १ : ३ लाख सात हजार १८६
कोल्हापूर उत्तर : १ लाख ४५ हजार ६९७ : १ लाख ४५ हजार ३०६ : ५ : २ लाख ९१ हजार ८
शाहुवाडी : १ लाख ५१ हजार ३३८ : १ लाख ४० हजार ६६६ : ३ : २ लाख ९२ हजार ००७
हातकणंगले : १ लाख ६६ हजार १९७ : १ लाख ५४ हजार ९६८ : ५ : ३ लाख २१ हजार १७
इचलकरंजी : १ लाख ५४ हजार ३३१ : १ लाख ४२ हजार ५७२ : ५५ : २ लाख ९६ हजार ९५८
शिरोळ : १ लाख ५७ हजार ०४५ : १ लाख ५१ हजार ४३३ : - : ३ लाख ८ हजार ४७८
एकूण : १६ लाख ५३८ : १५ लाख २१ हजार २९० : ७८ : ३१ लाख २१ हजार ९०६
--
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मतदान प्रक्रियेबाबत अधिक जागरुक आहेत. त्यामुळे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या नागरिकांची संख्या खूपच कमी होती. त्याबाबतदेखील बीएलओंच्या मार्फत पडताळणी करून छायाचित्र घेण्यात आली. काही नावे विविध कारणांमुळे वगळण्यात आली. आता कोल्हापुरात छायाचित्र नसलेला एकही मतदार नाही.
अर्चना शेटे
निवडणूक तहसीलदार
--