कोल्हापूर : कोल्हापूरच्या जनतेने महाडिक कुटुंबीयांना भरभरून दिले आहे. जनतेच्या प्रेमामुळेच आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. जनतेच्या कृतज्ञेतून उतराई होणे शक्य नाही, म्हणूनच त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेऊन, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. महाडिक कुटुंबीयांची बांधीलकी सर्वसामान्य जनतेशी असून, आयुष्यभर जनसेवेचे व्रत जोपासू, असे आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिले.चंद्रेश्वर (प्रभाग क्रमांक ५४) मध्ये उमेदवार प्रियांका इंगवले यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेनंतर ते बोलत होते. आमदार अमल महाडिक म्हणाले, महापालिकेतील सत्तेचा उपयोग जनकल्याणासाठी केला जाईल. जनतेच्या पाठबळामुळे महाडिक कुटुंबीयांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य आहे, याची जाणीव ठेवून, महाडिक कुटुंबातील प्रत्येक सदस्य कार्यरत आहे. पदरमोड करून, जनतेसाठी कामे, उपक्रम राबविले जातात. समाजातील सर्वच घटकांनी महाडिकांच्या हाती विविध सत्तास्थाने दिली आहेत; पण, त्यास सत्तेचा गैरवापर आजवर केलेला नाही आणि भविष्यात करणारही नाही. वाटचाल करत असताना ज्या पायरीवर आपण उभे राहतो, त्याला कधीही लाथाडत नाही. महापालिकेत भाजप-ताराराणी महायुतीची सत्ता येणार हे निश्चित आहे. यावेळी प्रकाश राऊत, प्रदीप इंगवले, तुकाराम बापू इंगवले, पंडितराव साळोखे, सुरेश गाडगीळ, शशिकांत घाटगे, भानुदास इंगवले आदींसह नागरिक उपस्थित होते.
आयुष्यभर जनसेवेचे व्रत जोपासू
By admin | Updated: October 31, 2015 00:27 IST