येथिल पंचायत समितीच्या उपसभापती निवडीमध्ये नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेचे दोन आणि स्वाभिमानीचे दोन अशा चार सदस्याच्या पाठिंब्यावर भाजपाच्या पूनम भोसले ( कोरोची) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीवेळी भाजपाचे तीन सदस्य गैरहजर राहिल्याने भाजपा मध्येच फूट पडली. या सभेच्या अध्यक्ष स्थानी तहसीलदार प्रदीप उबाळे होते.
हातकणंगले पंचायत समितीच्या २२ सदस्याच्या सभागृहा मध्ये भाजपा -६, जनसुराज्य - ५, ताराराणी पक्ष ( आवाडे ) -५, शिवसेना -२, स्वाभिमानी शेतकरी संघटना -२ काँग्रेस -१ आणि अपक्ष -१ असे त्रिशंकू बलाबल आहे. भाजपा -जनसुराज्य युती होऊन जनसुराज्यचे डॉ. प्रदीप पाटील यांची सभापतीपदी निवड झाली होती.
आज उपसभापती निवडीसाठी दुपारी २ वा पंचायत समिती सभागृहामध्ये तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. भाजपच्या पूनम भोसले यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र उपसभापतीपदावरून वाद होऊन भाजपाच्या ६ सदस्यांमध्ये फूट पडली. भाजापाचे वैजयंती अंबी (हूपरी), उत्तम सावंत ( नागाव ) आणि अजंना शिंदे ( तारदाळ ) यानी सभागृहाकडे पाठ फिरवली. त्यानंतर भाजपाचे ३, जनसुराज्यचे ५, शिवसेना २, स्वाभिमानी शेतकरी संघटना २, असे १२ सदस्य एकत्र आले आणि शिवसेना २ व संघटना २ अशा ४ सदस्याच्या पाठिंब्यावर भाजपाच्या पूनम भोसले ( कोरोची ) यांची उपसभापतीपदी निवड झाली. या सभेला ताराराणी पक्ष ( आवाडे ) ५, भाजपा ३, काँग्रेस १ आणि अपक्ष १ अशा १० सदस्यांनी गैरहजर राहून भाजपाच्या फुटीवर शिक्कामोर्तब केले.
फोटो - हातकणंगले उपसभापती निवड पूनम भोसले ( कोरोची )