कोल्हापूर : बारावीच्या लेखी परीक्षेच्या तोंडावर दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १२० विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटच चुकीचे असल्याचे आज, शनिवारी निदर्शनास आले. तर काही विद्यार्थ्यांना हॉलतिकिटच मिळालेले नाही, दुसरेच विषय हॉलतिकीटावर आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी संस्थेचे सचिव, प्राचार्यांना धारेवर धरले. दोन दिवसांवर परीक्षा असताना विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभादिवसी हा अनागोंदी कारभार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही अश्रूंचा बांध फुटला.बारावीची परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांना आधीच हॉलतिकिट देण्यात आली आहेत. मात्र, विमला गोयंका हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने शनिवारी हॉलतिकिटाचे वाटप केले. बारावीच्या वर्गात १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना १०० गुणांचे इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे चार तर २०० गुणांचा कॉम्प्युटर सायन्स विषय शिकवला जात आहे. परंतू, परीक्षेच्या हॉलतिकीटवर मात्र कॉम्प्युटर सायन्सऐवजी भूगोल, मराठी असे विषय आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला.
ही बाब निदर्शनास येताच संतप्त पालकांनी महाविद्यालय प्रशासनाचा याचा जाब विचारत एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दोन दिवसात हॉलतिकिट देण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा श्वास सोडला.