लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : तारदाळ (ता.हातकणंगले) येथे कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट ॲण्ड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेच्यावतीने तयार करून दिलेल्या वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या ठिकाणी अजून काही बाबींची पूर्तता गरजेची आहे. ती पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी अधिकाºयांना दिले आहेत. ते पूर्ण झाल्यावरच त्याचे उद्घाटन पालकमंत्री करतील, असे उत्तर नगरसेवक शशांक बावचकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले. तारदाळ येथे वाहनधारकांची गरज ओळखून वाहन पासिंग ब्रेक टेस्ट टॅक तयार करून देण्यात आला आहे. मात्र, त्याचे अद्याप उद्घाटन न झाल्याने शहापूर येथील शासकीय विश्रामगृहात एका कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी १० फेब्रुवारीपर्यंत ट्रॅक सुरू न केल्यास ११ फेब्रुवारीला सामुदायिक उद्घाटन करण्याचा इशारा दिला आहे. याला उत्तर म्हणून बावचकर यांनी ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर या वाहन पासिंग ट्रॅकचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते होईल, असे पत्रकात दिले आहे.