लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गोव्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात भरविण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे गोडवा २१ लाखांवर पोहोचला. शाहू स्मारकमध्ये पाच दिवस झालेल्या या महोत्सवात ३० टन द्राक्षांची, तर एक टन बेदाण्याची विक्री झाली.
द्राक्ष महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. शुक्रवार, २६ पासून सुरू झालेल्या या महोत्सवात मिरज, पलूस, तासगाव, जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्रीची साखळी तयार करण्यासाठी म्हणून पणन मंडळाच्या पुढाकाराने झालेल्या या महोत्सवाला पहिल्या दिवसापासू्नच कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. निर्यातीच्या दर्जाची, मधुर गोडीच्या द्राक्षांची खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाल्याचे चित्र होते. सरासरी ६० रुपये किलो या दराने ही द्राक्षे मिळत असल्याने ग्राहकांच्याही उड्या पडल्या. पहिल्या दोनच दिवसांत १२ टन द्राक्षांची विक्री झाली. पाच दिवसांच्या या महोत्सवात झालेल्या द्राक्ष विक्रीतून १८ लाख, तर बेदाणे विक्रीतून २ लाख ७३ हजार रुपये द्राक्ष उत्पादकांच्या पदरात पडले.
चौकट ०१
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मंगळवारी द्राक्ष महोत्सवाला भेट देऊन द्राक्षांचा आस्वाद घेतला. त्यांच्या या भेटीने महोत्सवाच्या ठिकाणचे वातावरणही भारावले होते. त्यांनीही विक्रेते शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा उत्साह वाढवला.
चौकट ०२
आता आंबा महोत्सव
द्राक्ष महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पणन विभाग कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड, पणजी, बेळगाव येथे आंबा महोत्सव भरवणार आहे. मे महिन्यात याचे नियोजन आहे, अशी माहिती पणनचे उप व्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.
फोटो: ३००३२०२१-कोल-ग्राप्स
फोटो ओळ : कोल्हापुरात भरलेल्या द्राक्ष महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनीही महोत्सवाला आवर्जून भेट दिली.