लोक मागणी विचारात घेऊन सरकारने दस्तनोंदणी कार्यालयास हिरवा कंदील दाखविल्याने नोंदणीच्या कामामुळे शासनास संकेश्वर केंद्रातून अधिक महसूल मिळेल, असे मत कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केले.
संकेश्वर येथे पालिका आवारात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दस्त नोंदणी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सीमा हतनुरे होत्या.
मंत्री कत्ती म्हणाले, कणगला भागातील १४ गावे निपाणीला जोडली होती ती पुन्हा या केंद्राला जोडल्याने संकेश्वरसह सज्यातील ३६ गावांचे खरेदी-विक्री, विवाह नोंदणी कामे याठिकाणी होणार आहेत. त्यामुळे या भागातील लोकांचा खर्च व वेळेची बचत होणार आहे. तसेच ५५ टक्के अधिक महसूल शासनाला या विभागातून मिळण्यास मदत होणार असून आठ दिवसात प्रत्यक्ष दस्तनोंदणी कामास सुरूवात होईल.
यावेळी उपनगराध्यक्ष अजित करजगी, स्थायी समिती सभापती सुनील पर्वतराव, अॅड. संतोष नेसरी, नोंदणी जिल्हा अधिकारी महांतेश पटतरी, संकेश्वर कार्यालय प्रमुख आर. आय. वकुंद यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. आर. बी. गडाज यांनी स्वागत केले. जगदीश इटी यांनी आभार मानले.
फोटो ओळी : संकेश्वर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दस्त नोंदणी कार्यालयाचे मंत्री उमेश कत्ती यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी नगराध्यक्षा सीमा हतनुरे, उपनगराध्यक्ष अजित करजगी आदी उपस्थित होते.
क्रमांक : १२०७२०२१-गड-०७