न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंटस् बँकेच्या सभासदांना ९.९० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होत असून, सभासदांना ९ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाइन घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष पंदारे बोलत होते. पंदारे म्हणाले, सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास दाखविल्याने यशाचे टप्पे गाठता आले. पारदर्शक कारभाराद्वारे बँकेने ठेवीचा चढता आलेख कायम राखला असून, सलग अकरा वर्षे शून्य टक्के एनपीए ठेवण्यात यश आले आहे. बँकेला कोविडच्या संकटातही २ कोटी २ लाख नफा झाला आहे. काेविडमुळे रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना २०१९-२० मध्ये लाभांश वाटप करण्यास परवानगी नाकारली होती. मात्र, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी परवानगी दिल्याने सभासदांना ९ टक्के लाभांश दिला जाणार आहे. सभासदांसाठी अद्ययावत सुविधा पुरवीत असताना कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सध्या ९.९० टक्क्यांनी कर्ज उपलब्ध होत असून, एवढ्या कमी दराने कर्ज देणारी गव्हर्नमेंट सर्व्हंटस् बँक ही सहकारातील पहिली बँक असल्याचेही अध्यक्ष पंदारे यांनी सांगितले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी अहवाल वाचन केले. विषयावर चर्चा होऊन उपस्थित सभासदांनी सर्व विषयांस ऑनलाइन मंजुरी दिली. यावेळी संचालक मधुकर पाटील, शशिकांत तिवले, प्रकाश पाटील, राजेंद्र चव्हाण, भरत पाटील, अतुल जाधव, राजेंद्र पाटील, रमेश घाटगे, हेमा पाटील, नेहा कापरे, संजय सुतार, जयदीप कांबळे, बाळासाहेब घुणकीकर, रूपेश पाटोळे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष विलासराव कुरणे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंटस् बँकेची ऑनलाइन १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. यामध्ये अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे व संचालक उपस्थित होते. (फोटो-१२०९२०२१-कोल- गव्हर्नमेंट बँक)