कोल्हापूर : ई. पी. एस. ९५ निवृत्त पेन्शनधारकांनी आपल्या मागण्यांसाठी पापाची तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिरापर्यंत शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत अर्धनग्न होऊन पदयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.सर्व श्रमिक संघाच्यावतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या या पदयात्रेत पेन्शनरांची फसवणूक करणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. जावडेकर यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून केंद्रीय श्रममंत्री बंगारू दत्तात्रय यांना ‘किमान एक हजार रुपये पेन्शन’ ही योजना घोषित करण्यासाठी प्रथम मान्यता दिली. मात्र, या पेन्शन घोषणेनंतर ९० दिवस उलटून गेल्यावरही अद्यापही या योजनेचा लाभ अजूनही अनेकांना मिळालेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत या प्रश्नाकडे केंद्राचे लक्ष जावे, याकरिता ही पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती संघटक आप्पा कुलकर्णी यांनी पेन्शनधारकांपुढे आपल्या भावना व्यक्त करताना केली. यावेळी सर्व पेन्शनधारकांनी किमान ६५०० रुपये अधिक महागाई भत्ता मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. यावेळी पेन्शनरांनी हलगी वाजवून मोदी सरकारचा धिक्कार केला; तर ‘मोदी तेरे राज में पेन्शनर भुखे मरते’ अशा घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पदयात्रेत गिरणी कामगार संघटनेचे नेते दत्तात्रय अत्याळकर, आप्पा कुलकर्णी, बाळकृष्ण शिरगावकर, सुभाष सावंत, वसंत माने, श्रीकांत माने, आदींनी अर्धनग्न आंदोलनात सहभागी होत आपले मनोगत व्यक्त केले.
शासनाचा निषेध : किमान १ हजार पेन्शन देण्याची घोषणा फसवी
By admin | Updated: May 23, 2015 00:26 IST