मेघोली पाटबंधारे प्रकल्पाचे ५०-५० मीटरचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला आहे. नशिबाने लोकवस्ती डोंगरावर असल्याने विशेष मनुष्यहानी झाली नाही. मात्र एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मोटारी, पाईप व जनावरे वाहून गेल्यामुळे नुकसान झाले. तर जमिनी खरडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेघोली ग्रामस्थांचे धरणाचे तातडीने पुनर्भरण करण्याची मागणी आहे. मात्र, पाऊस कमी झाल्यानंतर याबाबत निर्णय घेऊन निश्चित पुनर्भरण केले जाईल. नुकसानभरपाईसाठी पंचनामे केले आहेत. सातबारा उताऱ्यावरून हद्द निश्चित करून जमिनीचे सपाटीकरण केले जाईल व शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल. ओढ्याचे पात्र खुले करण्यासाठी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या आहेत. त्याचेही काम तातडीने सुरू होईल. वरकरवाडी पूल व रस्ता याबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल, असेही नामदार जयंत पाटील यांनी सांगितले.
मेघोली पाटबंधारे प्रकल्प दुर्घटनेबाबत तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्याप्रमाणे येत्या १४ सप्टेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक घेऊन तातडीने नुकसानभरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही नामदार जयंत पाटील यांनी सांगितले.