कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दीपावलीसाठी विक्रमी ४५ कोटी ७ लाख ५० हजार रुपये दूध फरक देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. म्हैस दुधाला प्रतिलिटर १ रुपये ७५ पैसे, तर गाय दुधाला ८५ पैसे देण्यात येणार असून, गेल्या वर्षीपेक्षा प्रति लिटर २० पैसे जादा फरक दिल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष पाटील म्हणाले, दूध संघाच्यावतीने दीपावलीला दूध फरक दिला जातो. यावर्षी दूध व्यवसायासमोर अनेक अडचणी आल्या. दूध पावडरचे दर वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी दुधाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यातूनही संघाने आपला दर्जा टिकवत उच्चांकी विक्री केली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात संघाची १६०० कोटींची उलाढाल झाल्याने नफ्याचे प्रमाणही वाढले आहे. आजपर्यंत संघाच्या नफ्यातील जास्तीत जास्त वाटा हा दूध उत्पादकांच्या पदरात टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळेच यावर्षी म्हशीला प्रतिलिटर १ रुपये ९५ पैसे तर गायीला १ रुपये ५ पैसे दूध फरक देण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. त्यातील प्रतिलिटर २० पैसे दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स ठेव म्हणून कपात केले जाणार आहेत. ही रक्कम संस्थांच्या नावांवर दीपावली पूर्वी वर्ग करण्यात येणार असून, तोपर्यंत या रकमेचे ६ टक्केप्रमाणे व्याजही संस्थांना दिले जाणार आहे. आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संघाची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा करून संचालक मंडळाला विश्वासात घेऊन दूध उत्पादकांना आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी फरक दिला असल्याचे दिलीपराव पाटील यांनी सांगितले. संचालक अरुण नरके, विश्वासराव पाटील, रणजीतसिंह पाटील, पी. डी. धुंदरे, विश्वास जाधव, दिनकर कांबळे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते.
‘गोकुळ’चा विक्रमी ४५ कोटींचा दूध फरक
By admin | Updated: July 31, 2014 00:38 IST