सांगरूळ : दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमती, पशुखाद्यांचे वाढते दर पाहता दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेला आहे. अशा काळात दूध दरवाढ करून उत्पादकांना दिलासा देणे गरजेचे असून, ‘गोकुळ’ने प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी, अशी मागणी कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक निवास वातकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ‘अमुल’चे संकट समोर आहे, याचे भान ठेवून वारेमाप खर्च कमी करून उत्पादकांचे हित जोपासा, असा टोलाही त्यांनी हाणला. यावेळी निवास वातकर म्हणाले, उत्पादन खर्च व दुधाला मिळणारा दर यांचा ताळमेळ बसत नाही. गेल्या चार-पाच वर्षांतील ‘गोकुळ’ने पशुखाद्यांच्या दरात दहापटीने वाढ केली; पण दूध दरवाढ अगदी नगण्य केली. सामान्य माणसाच्या जीवनात क्रांती करण्याचे काम स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी ‘गोकुळ’च्या माध्यमातून केले; पण ती दृष्टी आता कोठेच दिसत नाही. एकीकडे वारेमाप खर्च करायचा आणि दुसरीकडे पशुखाद्य कारखाना तोट्यात असल्याचे भासवत दरवाढ केली जाते. ‘गोकुळ’ची पुणे, मुंबईत ५० रुपये लिटरने दूध विक्री होते; पण त्याच प्रतीचे दूध उत्पादकांकडून ३४ रुपयांनी खरेदी केले जाते. प्रतिलिटर १६ रुपयांचे मार्जिन घेऊन उत्पादकांचे शोषण सुरू आहे. गायीच्या उत्पादकांचे तर कंबरडे मोडले आहे. दरात कपात करण्याबरोबरच दरफरकातही त्यांना मारले आहे. काही संस्था खासगी विक्री करून उत्पादकाला चार पैसे जादा देत होत्या; पण त्यावर निर्बंध आणून संस्थांना अडचणीत आणण्याचे काम केले. ‘अमुल’ संघ कोल्हापुरात येत आहे. स्पर्धा असली की चांगला कारभार होतो, हे खरे असले तरी स्पर्धेत शेतकऱ्यांचे ‘गोकुळ’ वाचले पाहिजे, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे संचालकांनी वारेमाप खर्च कमी करून उत्पादकांचे हित जोपासावे, अशी मागणी करीत दरवाढ केली नाही, तर आंदोलन उभे करू, असा इशारा निवास वातकर यांनी दिला. यावेळी माजी सरपंच आनंदा कासोटे, राजाराम खाडे, सुशांत नाळे, संभाजी नाळे, तानाजी वातकर, प्रशांत खाडे, महेश वातकर, अनिल घराळ उपस्थित होते. म्हशीच्या व्यतातील उत्पन्न व खर्चउत्पन्न खर्च१५०० लिटर दूध उत्पादन - ५५ हजार ९५० रुपयेपशुखाद्य (वर्षाचे)- १८ हजार ५२८ रुपये दूध रिबेट शेकडा १५ टक्के - ८ हजार ३९२ रुपयेवैरण (९ टन) - ४५ हजारसंघ फरक, प्रतिलिटर २.०५ - ३ हजार ७५ रुपयेगुंतवणूक (म्हशीच्या किमतीचे व्याज)- ६ हजारऔषधोपचार व रेतन- २ हजारपशुपालकाची मजुरी- ३६ हजार ५०० रुपये एकूण उत्पन्न - ६७ हजार ४१७ रुपय एकूण खर्च - १ लाख ८ हजार २८ रुपये
‘गोकुळ’ने खरेदी दरात वाढ करावी
By admin | Updated: November 9, 2016 01:28 IST