ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांना गोकुळ दूध संघात संचालक या रूपाने सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच गुलाल लागला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सेनापती कापशी मतदारसंघातून अवघ्या ५१ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागल्यापासून त्यांनी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. पहिल्याच प्रयत्नात गोकुळमध्ये त्यांना संचालक होता आले आहे.
जिल्हा परिषदेतील दोघांची एंट्री
जिल्हा परिषदेत सदस्य, सभापती म्हणून मागील पंचवार्षिकमध्ये कारकीर्द गाजविलेले राधानगरीचे अभिजित तायशेटे, तर प्रयाग चिखलीचे एस. आर. पाटील यांनीही पहिल्याच प्रयत्नात गोकुळची हंडी सर केली आहे.
वीरेंद्र मंडलिकांचा गुलाल हुकला
वीरेंद्र मंडलिक यांची राजकारणात एंट्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक लढवली; पण त्यांना बोरवडे मतदारसंघात मनोज फराकटे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता गोकुळच्या निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले; पण तेथेही त्यांना गुलालाने हुलकावणी दिली.
नरके बंधूंच्या गळ्यात विजयाची माळ
गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी निवडणुकीत माघार घेत मुलगा चेतन नरके यांना पुढील चाल दिली. चेतन नरके हे सत्ताधारी आघाडीकडून विजयी झाले. त्याचवेळी विरोधी आघाडीकडून रिंगणात असलेले अरुण नरके यांचे पुतणे व माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांनी विजयी पताका फडकावली. अजित नरके यांनाही जिल्हा परिषदेत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. एकमेकांच्या विरोधी पॅनेलमध्ये असतानाही दोघांनाही यश मिळण्याचे आणि एक नरके जाऊन त्यांच्या जागी दोन नरके गोकुळ दूध संघात आल्याचे दुर्मीळ उदाहरण घडले आहे.