जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत समारोपाच्या भाषणात मुश्रीफ यांनी, जिल्हा बँकेचा कारभार चांगला सुरू असल्याने निवडणूक बिनविरोध करावीू अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार असू, तर त्यांनीही गोकुळ बिनविरोध करण्यासाठी मदत करायला हवी, अशीही अपेक्षा आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केली. त्यावर उपस्थित संचालकांनी मग आपण स्वत: मुश्रीफ यांच्याशी चर्चा करावी, असे सूचविले. जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या संस्थांची निवडणूक बिनविरोध होणार असेल, तर आम्हाला त्यात गैर वाटण्याचे कारण नाही, असेही संचालकांनी स्पष्ट केले.
सतेज पाटील यांच्याशीही चर्चा...
गोकुळ सत्तारूढ गटातर्फे निवडणुकीसंदर्भात जी काही चर्चा करायची असेल, त्याचे अधिकार आमदार पी. एन.पाटील यांना देण्यात आले आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक त्यात कुठेच सहभागी होणार नाहीत. त्यामुळे त्यांची काही अडचण येणार नसली, तरी पालकमंत्री सतेज पाटील यांचा विषय उपस्थित झाला. त्यावर पी. एन. यांनी माझा काही त्यांना विरोध नाही. चर्चा करायची असेल, तर त्यांच्याशीही करू शकतो, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.