कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना सरासरी २३०० रुपये पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला. तब्बल चार तास चाललेल्या संचालक मंडळाच्या मॅरेथॉन बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी सायंकाळी आनंदोत्सव साजरा केला. कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत जून २०१४ मध्ये संपल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. सकाळी साडेदहा वाजता आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात संचालक मंडळाशी चर्चा केली. कर्मचारी संघटनेचे नेते गोविंद पानसरे मुंबईला असल्याने त्यांच्याशी चर्चा करून संचालक मंडळ लवकरच निर्णय घेईल, अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी कर्मचाऱ्यांना दिली. दुपारी एक वाजल्यापासून संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर संचालक मंडळाची मॅरेथॉन बैठक झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांनी तीन हजार रुपये पगारवाढीच्या केलेल्या मागणीवर चर्चा झाली; पण संघाची आर्थिक स्थिती व दूध व्यवसायातील आगामी आव्हाने याचा विचार करून तेवढी पगारवाढ देणे शक्य नसल्याचे संचालकांनी सांगितल्यानंतर २३०० रुपये वाढीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ध्वज व बॅच उतरवत संघाच्या ताराबाई पार्क, गोकुळ प्रकल्प, बिद्रीसह इतर चिलिंग सेंटरवर साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. ताराबाई पार्क येथे झालेल्या गेट मीटिंगमध्ये पिलाजी पाटील म्हणाले, कामगार चळवळीत संघटनेला महत्त्व आहे. प्रामाणिक काम केल्यानंतर प्रशासनाने अन्याय केला, तर त्याविरोधात एकसंधपणे आवाज उठविला जाईल; पण कामचुकारांच्या मागे संघटना राहणार नाही. पी. आर. पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळ, संघटना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पावणेपाच कोटींचा संघावर बोजासंघाच्या १६९१ कायम कर्मचाऱ्यांना सरासरी २३०० रुपये पगारवाढ होणार आहे. यामुळे संघावर ४ कोटी ७० लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. सुपरवायझर संघाची ताकद!संघाच्या वाटचालीत सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान आहेच, पण थेट कच्च्या मालाशी सुपरवायझरांचा संबंध येत असल्याने तेच संघाची खरी ताकद असल्याचे संघटनेचे सदस्य पिलाजी पाटील यांनी सांगितले.
‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांना २३०० रुपये पगारवाढ
By admin | Updated: December 28, 2014 00:28 IST