हुपरी : हुपरी परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी गरजेचे असणारे हुपरी येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आदेश दिला आहे. नगरपरिषद प्रशासनानेही त्यासाठी रीतसर मागणी केलेली असतानाही हे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दुर्लक्ष का करण्यात येत आहे या मागचे गौडबंगाल काय? कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय आरोग्य यंत्रणेला जाग येणार नाही का, अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहेत.
परिसरातील कोरोना रुग्ण व वाढलेला मृत्युदर यामुळे सर्वत्र भीतीयुक्त चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर सुरू करण्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सेंटर सुरू करण्यासाठी दिलेल्या आदेशाला आरोग्य विभागाने सरळसरळ केराची टोपली दाखविण्याचा प्रकार घडला आहे.
हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, तळंदगे, इंगळी, यळगूड, जंगमवाडी, रांगोळी, आदी गावांतील बाधित रुग्णांसाठी हुपरी येथील शेंडुरे महाविद्यालयाच्या वसतिगृहात गेल्या वर्षी कोविड केंद्र सुरू केले होते. त्यामुळे हुपरी परिसरातील रुग्णांना त्याचा चांगला लाभ झाला होता. चार दिवसांपासून परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली असून, मृत्युदरही वाढला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे व भीतीयुक्त वातावरण पसरले आहे, अशी वस्तुस्थिती असतानाही जिल्हा आणि तालुका आरोग्य विभागाचे प्रशासन मात्र येथील कोविड केंद्र सुरू करण्याबाबत उदासीन दिसत आहे.
हुपरी नगरपरिषदेने २० एप्रिलला हे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी आणि हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे. येथील शेंडुरे महाविद्यालयाच्या वसतिगृहात ६० बेडचे केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, राज्यमंत्री व नगरपरिषदेच्या पत्राकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे हे कोविड केंद्र अद्याप सुरू झालेले नाही.