कोल्हापूर : वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आज, गुरुवारी पहाटे मुलीने शिवाजी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. माधुरी सदाशिव जाधव (वय २२, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, माधुरी आई-वडिलांसह लहान भावासोबत राहत असे. वडिलांची सोडावॉटरची हातगाडी होती. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते कुटुंबाचा खर्च भागवीत होते; तर आई अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार पुरविते. माधुरीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्याने सुरुवातीच्या काळात ती चार्टर्ड अकौंटंटकडे नोकरीला होती. त्यानंतर ती नोकरी सोडून घराशेजारी असणाऱ्या स्पोर्टस्च्या दुकानात काम करीत होती. सगळे काही व्यवस्थित असताना दोन वर्षांपूर्वी वडील आजारी पडले. ते घरी झोपून राहिल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी तिच्यावर येऊन ठेपली. तिच्या पगारातून वडिलांच्या औषधांसह कुटुंबाचा खर्च ती चालवीत असे. दोन दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले. हा धक्का तिला सहन झाला नाही. दरम्यान, बुधवारी रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले. आज पहाटे चारच्या सुमारास शौचालयास जाते असे सांगून ती झोपेतून उठून घरातून बाहेर पडली. जाताना तिने घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली. बराच वेळ ती परत न आल्याने आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो उघडला नाही. त्यामुळे त्यांनी शेजारील लोकांना हाक मारून दरवाजाची कडी काढण्यास सांगितले. बाहेर येऊन पाहिले असता दारामध्ये पार्किंग केलेली मोपेड नव्हती. त्यामुळे ती कुठेतरी निघून गेली आहे, याची कल्पना आईला झाली. त्यांनी शोधाशोध केली असता मिरजकर तिकटी चौकात तिची मोपेड मिळून आली. त्यानंतर तिचा भाऊ व नातेवाईक शिवाजी पुलावर आले. याठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. त्यांनी पाहिले असता माधुरीने उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी) बांधकाम साहित्यावर पडलीमाधुरीने जुन्या शिवाजी पुलावरून नवीन पुलाच्या दिशेला उडी मारल्याने ती खाली बांधकामासाठी टाकलेल्या साहित्यावर पडली. त्यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागेवरच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये पाठविला. अधिक तपास सहायक फौजदार अशोक भोसले करीत आहेत.
वडिलांच्या विरहाने मुलीची आत्महत्या
By admin | Updated: January 15, 2015 23:20 IST