कोल्हापूर : वाजतगाजत भक्तांच्या घरी आलेली गौराई सोमवारी नटली. शंकरोबाचे आगमन झाले. गौरीचा औसा पुजला आणि पुरणपोळीसारख्या पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गल्लोगल्ली झिम्मा-फुगडीचा खेळ रंगला. आज या घरगुती गणेशोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
भक्तांचा पाहुणचार घेण्यासाठी पाच दिवसांपूर्वी आलेल्या गणरायानंतर दोन दिवसांनी गौराईचे माहेरी आगमन झाले. आपली पत्नी आणि लेकाला नेण्यासाठी सोमवारी शंकरोबादेखील आले. सुरेख सजावटीत गणपती बाप्पांशेजारी गौरी आणि शंकरोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गौरीच्या उभ्या मूर्ती, सुंदर जरीकाठाच्या साड्या आणि अलंकारांनी सजल्या. गौराईचे रूप खुलले. सोमवारी सकाळी शंकरोबाचे आगमन झाल्यानंतर देवाची मूर्ती पुजण्यात आली. यादिवशी गौराईचा औसा पुजला जातो. यानिमित्त खाऊच्या पानावर काकडी, केळी, सुपारी ठेवून हळदी-कुंकू वाहण्यात आले. औसा पूजनानंतर आरती करण्यात आली व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
घरगुती गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत पारंपरिक खेळ खेळले जातात. आता सगळे दिवस हा सोहळा करता येत नसला तरी गौरीच्या दोन दिवसांत आवर्जून हे खेळ खेळतात. त्यामुळे रविवारी व सोमवारी रात्री उशिरापर्यंत भागाभागात विशेषत: ग्रामीण भागात झिम्मा, फुगडी, काटवट कणा, छुईफुई, घोडा-घोडा, पिंगा असे विविध खेळ खेळण्यात आले. मंगळवारी घरगुती गणेशोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. मंगळवारी या परिवार देवतांना जड अंत:करणाने निरोप द्यावा लागणार आहे.
---
फाेटो आधी पाठवला आहे.
--