कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनअंतर्गत गॅस वितरणाची वेळ दोन टप्प्यांत विभागण्यात आली असून, ही वेळ पुरेशी नाही, तरी पूर्वीप्रमाणे दिवसभर गॅस सिलिंडरचे वितरण करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी फेडरेशन ऑफ एलपीजी डिस्ट्रिब्युटर्सने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या कोरोना महामारीतही गॅस सिलिंडरचे वितरण अखंडितपणे सुरू आहे. ही घरपोच सेवा देताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, तेथे भरलेला सिलिंडर देऊन रिकामा सिलिंडर गाडीत टाकणे यासाठी वेळ लागतो. शिवाय अनेक कर्मचारी परगावहून येत असल्याने त्यांना सकाळी सहाची वेळ गाठणे अवघड जाते. जिल्ह्यासाठी गॅसचा पुरवठा झाला की ते उतरवून घेणे जिकिरीचे जाते. तरी याचा विचार करून दिवसभर गॅस वितरणाला परवानगी मिळावी. गॅस वितरणातील कर्मचाऱ्यांना अद्याप फ्रंटलाइन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. त्यांचे लसीकरण झालेले नाही. ४५ वर्षांखालील या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणालाही प्राधान्यक्रम मिळावा अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष अभयकुमार बरगाले यांनी केली आहे.
-