शहरातील शाहूपुरी, कुंभार गल्ली आणि गंगावेश येथे सकाळपासूनच नागरिकांची आपला देव घरी नेण्यासाठी गर्दी झाली. येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून येथे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. लोकांना काही अंतर पायी यावे लागायचे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. येथे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे, एकाचवेळी गर्दी न करण्याचे आवाहन केले जात होते.
---
सहकुटुंब आगमन
गणेशमूर्ती नेण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार लोक आले होते. लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळे उत्साहाने देव नेण्यासाठी आले होते. त्यामुळे कुंभार गल्ल्यांना यात्रेचे स्वरूप आले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणेश गणेश मोरया’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. फटाक्यांची आतषबाजी, काही जणांकडून चिरमुऱ्यांची उधळण केली जात होती.
----