कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘टाळ्यांच्या गजरात’ शहरातील काही मंडळांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी गणेशमूर्ती आणल्या. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांना सकारात्मक प्रतिसाद देत या मंडळांनी आपल्या गणेशाची प्रतिष्ठापना केली.
कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे सरकारने गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी मंडळांनी शुक्रवारी (दि. १०) रात्रीपर्यंत आपल्या गणेशमूर्ती वाजतगाजत न आणता मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात आणल्या. त्यांची विधिवत प्रतिष्ठापनाही केली. दरवर्षी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही मंडळांची आगमन मिरवणूक वादाचा मुद्दा ठरते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवत साधेपणाने गणेशमूर्ती नेण्यास मंडळांना प्रोत्साहित केले. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत २२२ मंडळांनी आपल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २४२ मंडळांपैकी २३८ मंडळांनी अत्यंत साधेपणाने व मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवारी रात्रीपर्यंत केली, तर चार मंडळांनी शनिवारी सायंकाळी केली, तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६२ मंडळांपैकी २५५ मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली असून, उर्वरित सात मंडळांनी शनिवारी रात्री अत्यंत साधेपणाने आपल्या गणरायाचे स्वागत केले.
या गणरायांचे आगमन झाले
जुना राजवाडा पोलीस ठाणे : साईबाबा ग्रुप, फुलेवाडी, हिंदवी स्पोर्टस् (शिवाजीपेठ), जयमहाराष्ट्र मित्रमंडळ (सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर), तिरंगा मित्रमंडळ (आठ नंबर शाळेजवळ, शिवाजीपेठ), महाकाली तालीम मंडळ, दिलदार डी बाॅइज (टिंबर मार्केट), झुंजार क्लब, (बुवा चौक शिवाजी पेठ), तर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री तरुण मंडळ (केडीसीसी बँकेजवळ, शाहूपुरी), किशोरप्रेमी गणेश मंडळ (कसबा बावडा), राजू मोरे फाउंडेशन (कसबा बावडा), शिवप्रेमी गणेश मंडळ (कसबा बावडा) या मंडळांचा समावेश आहे.