नागरिकांनी स्वतः शिस्त लावण्याची गरज
गांधीनगर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संचारबंदी नाइलाजाने जाहीर केली खरी; पण या निर्णयाला गांधीनगर व्यापारी पेठेत हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होऊन नागरिक मुक्त संचार करत आहेत. लोकांना या संसर्ग रोगाचे गांभीर्य लक्षात येईना, असे झाले आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण बाजारपेठेत फिरताना दिसत आहेत. काही व्यापारी तर अत्यावश्यक सेवेच्या नियमावलीत नसतानाही शटर खाली करून आतून व्यवसाय सुरू ठेवत आहेत. हे चित्र गांधीनगरात अनेक ठिकाणी दिसत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोरोना नियमांना केराची टोपली दाखवीत असलेल्या नागरिकांना पोलिसांचीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सकाळी सिंधू मार्केटच्या व्यापारी लाइन, तसेच शिरू चौक, शाळेच्या ग्राउंडमधील भाजी मंडईत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे येथे कोरोना महामारीच्या संसर्गवाढीला आमंत्रण दिले जात असल्याचे चित्र आहे.
चौकट : गांधीनगर ग्रामपंचायतीने सुरुवातीला विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा लावला होता; पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून ग्रामपंचायतीची कारवाई सुस्त झाली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावरून बिनधास्त विना मास्क फिरत आहेत. गांधीनगर पोलिसांनीही मोकाट फिरणाऱ्या वाहनधारकांवर वाहन जप्तीची जुजबी कारवाई सुरू केली. नंतर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे याचा फटका अत्यावश्यक कामासाठी बाहेर फिरणाऱ्यांना होत आहे.
फोटो : ०६ गांधीनगर बाजारपेठ
ओळ:- गांधीनगरमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
२) एका दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. (छाया : बाबासाहेब नेर्ले)