गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र जगप्रसिद्ध असतानाच मंदिर व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या ठिकाणी भाविकांना पैसे घेऊन देण्यात येणाऱ्या लाडू प्रसादामध्ये एका भाविकाला झुरळ आढळल्याने लाडू प्रसाद विक्री करण्यासाठी भेसळ कार्यालयाने बंदी घातली आहे.गणपतीपुळे तीर्थक्षेत्रामध्ये एका भक्ताने लाडू प्रसाद खरेदी केला. प्रसाद खाण्यासाठी त्यांनी पाकीट उघडले असता त्यामध्ये झुरळ दिसून आले. त्यांनी याबाबत अन्न भेसळ कार्यालयाशी संपर्क साधून अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेतले. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला. या प्रकारामुळे भक्तगणांमध्ये संताप उमटला आहे. अन्न भेसळ अधिकाऱ्यांनी लाडू तपासणीसाठी ताब्यात घेतला आणि लाडूप्रसाद विक्री त्वरित थांबवण्याची विनंती केली. याबाबत पत्रकारांनी संस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा प्रकार खरा असून, अन्न भेसळ कार्यालयाने प्रसादाचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. त्यांच्याकडून येणारा अहवाल तसेच तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा भक्तांसाठी हा प्रसाद चालू राहणार आहे. तसेच पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याकडे पंचकमिटी लक्ष देईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकारामुळे गणपतीपुळे परिसरात सध्या संतापाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
गणपतीपुळेत लाडू प्रसादामध्ये झुरळ
By admin | Updated: August 8, 2014 00:42 IST